संयुक्त राष्ट्र संघातील प्रवचन

सहस्राब्दि जागतिक शांतता शिखर परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहात मंगळवार दि. २९ ऑगस्ट २००० रोजी श्री. स. ना. गोयन्काजींनी दिलेले संपूर्ण प्रवचन खालीलप्रमाणे आहे.

श्री स. ना. गोयन्काजी द्वारा ‘विश्वशांतीसाठी सार्वभौम आध्यात्मिकता’

तारिखः ऑगस्ट २९, २०००

सहस्राब्दि जागतिक शांतता शिखर परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहात मंगळवार दि. २९ ऑगस्ट २००० रोजी श्री. स. ना. गोयन्काजींनी दिलेले संपूर्ण प्रवचन खालीलप्रमाणे आहे.

जिथे अंधार असतो, तिथे प्रकाश आवश्यक असतो. आज हिंसेने निर्माण केलेले वादविवाद, युद्ध आणि रक्तपातामुळे सर्वत्र दुःखदायक स्थिती असताना जगाला आत्यंतिक आवश्यकता आहे, ती ऐक्याची आणि शांततेची. धार्मिक आणि आध्यात्मिक नेत्यांसाठी हे फार मोठे आव्हान आहे. हे आव्हान आपण स्वीकारूया.

प्रत्येक धर्माचे एक बाह्य आवरण असते आणि एक अंतरंग, एक मध्य असतो. बाह्यावरणामध्ये विधी, आचारपद्धती, संस्कार, मत, रूपक आणि सिद्धांत असतात. हे धर्मागणिक बदलते असतात. परंतु सर्व धर्मांचे अंतरंग मात्र समान असते ; ते म्हणजे सदाचार आणि उदारता शिकवणारे, तसेच सहिष्णुता, सौहार्दता, दया आणि प्रेम यांनी परिपूर्ण असणाऱ्या शुद्ध आणि शिस्तपूर्ण मनाची शिकवण देणारे सार्वभौम असे ज्ञान. ह्या समान सूत्रावर प्रत्येक धार्मिक नेत्याने भर दिला पाहिजे आणि धर्माभिमान्यांनी आचरणात आणले पाहिजे. सर्व धर्मांच्या ह्या अंतरंगाला जर योग्य महत्त्व दिले गेले आणि बाह्य भावांप्रती अधिक सहिष्णुता दाखवली गेली, तर विवाद कमी होतील.

सर्व व्यक्तींना आपल्या श्रद्धेचे अनुगमन करण्याचे आणि तदनुषंगिक आचरणाचे स्वातंत्र्य असावे. मात्र असे करताना त्यांनी त्यांच्या धर्माच्या अंतरंगाकडे, अंतरतत्वाकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ नये तसेच त्यांच्या धार्मिक आचरणामुळे इतरांचा शांतीभंग होऊ नये, त्यांच्या धर्मश्रद्धांना कमी लेखू नये अथवा त्यांची निंदा करू नये, ही काळजी घ्यावी.

धर्मश्रद्धांमधले वैविध्य लक्षात घेता, आपल्याला मतभेदांवर मात कशी करता येईल आणि शांततेसाठी परिपूर्ण योजना कशी साकारता येईल? निरनिराळी मते असणारे अनेक जण ज्ञान प्राप्त झालेल्या अशा गौतम बुद्धाकडे जात असत. त्यांना तो सांगत असे, “आपण आपले मतभेद बाजूला ठेवूया. आपले एकमत ज्याच्यावर होऊ शकेल, अशा बाबींकडेच आपण लक्ष देऊया आणि तेच आचरणात आणूया, भांडायचे कशासाठी?” तो शहाणा सल्ला आजही तितकाच मौल्यवान आहे.

मी अशा भूमीतून आलो आहे, जिने गेल्या काही सहस्राब्धींमध्ये अनेक तत्वज्ञान आणि आध्यात्मिक मत-शाखांना जन्म दिला आहे. हिंसेच्या काही तुरळक स्वतंत्र घटना वगळता, शांततापूर्ण सहजीवनाचा नमुना म्हणून माझ्या देशाकडे पाहिले जाते. सुमारे २३०० वर्षांपूर्वी ज्यावर सम्राट अशोकाने राज्य केले होते, तेव्हाचे राज्य आजच्या अफगाणिस्तानापासून ते बांगलादेशापर्यंत पसरलेले होते. ह्या दयाळू राजाने त्याच्या संपूर्ण राज्यकारकिर्दीत दगडी आज्ञापत्रे खोदून घेतली, ज्यामध्ये सर्व धर्मश्रद्धांचा आदर करण्याबाबतचे आदेश होते, परिणामतः सर्व आध्यात्मिक परंपरेतल्या अनुयायांना त्याच्या छत्राखाली सुरक्षित वाटत असे. तो आपल्या प्रजाजनांना नीतीपूर्ण आयुष्य जगण्यास, आपल्या माता-पित्यांच्या व वडीलधाऱ्यांचा मान ठेवण्यास तसेच हिंसेपासून परावृत्त होण्यास सांगत असे. आपल्या प्रजाजनांना प्रवृत्त करणारे त्याचे ते शब्द आजही समर्पक आहेत.

फक्त स्वतःच्या धर्माला मान देऊन इतर धर्मांची निंदा करू नये. त्यापेक्षा, प्रत्येकाने विविध कारणांसाठी दुसऱ्या धर्मांचाही मान ठेवावा. असे करण्याने तो आपलाच धर्म वाढण्यास मदत करत असतो आणि इतरांच्या धर्माचीही सेवा करत असतो. ह्याउलट विरूध्द आचरणातून तो आपल्या धर्मासाठी थडगे तर खणतोच, पण इतरांच्या धर्माचीही हानी करतो. स्वतःच्या धर्माचा आदर ठेवणे आणि दुसऱ्याच्या धर्माची निंदा करणे, हे एखादा कदाचित स्वतःच्या धर्मनिष्ठेखातर ‘माझ्या धर्माचा मी गौरव करेन’ अशा विचाराने करतही असेल, परंतु त्याचे हे कृत्य त्याच्याच धर्माची अधिक हानी करेल. आपापसातील एकता अधिक चांगली. आपण सर्व इतर धार्मिक सिद्धांत ऐकूया आणि ऐकण्याची इच्छाही ठेवूया. (कोरीव पाषाण १२).

सम्राट अशोक, हा सहिष्णूता, सहवर्तन आणि शांतीपूर्ण संयोगीकरणाच्या गौरवपूर्ण परंपरेचे प्रतिनिधीत्व करतो. ही परंपरा आजच्या शासन आणि राज्यकर्त्यांमध्ये जागृत आहे. याचे उदाहरण म्हणजे ओमानचे थोर राजे, ज्यांनी स्वतःच्या धर्माचे निष्ठापूर्वक आणि एकाग्र पालन करताना इतर धर्मश्रद्धांच्या चर्च आणि मंदिरांसाठी जमीन उपलब्ध करून दिली. मला खात्री आहे की, असे दयाळू राजे आणि शासनकर्ते पुढील काळात जगभरातील अनेक देशांमध्ये निर्माण होत राहतील. म्हटले आहेच, “शांतीनिर्माते धन्य आहेत, कारण ते ईश्वराची संतान म्हणून ओळखले जातील”.

हे अतिस्पष्ट आहे, की हिंसेचे उपासक प्रथम स्वतःचे आप्त आणि नातेवाईक यांची हानी करतात. त्यांच्या असहिष्णुपणातून ते असे प्रत्यक्ष तरी करतील, किंवा मग त्यांच्या कृतीला हिंसात्मक प्रतिसाद मिळण्याकरिता चिथावून अप्रत्यक्षरित्या तरी करतील. उलटपक्षी असे म्हटले आहे की, “धन्य ते क्षमावंत, कारण त्यांनाच क्षमा मिळेल”. हा निसर्गनियम आहे. दुसऱ्या शब्दांत यालाच ईश्वराचा निर्णय किंवा मार्ग असेही म्हणता येईल. गौतम बुद्धाने म्हटले आहे, “वैर हे वैराने संपणार नाही, तर फक्त त्याच्याविरुद्ध केलेल्या कृतीनेच संपेल. हा शाश्वत धर्म आहे. [आध्यात्मिक नियम].” भारतात ज्याला धर्म असे संबोधले जाते, त्याचा हिंदुत्व, बुद्धीझम, जैनीझम, ख्रिस्तीझम, इस्लाम, ज्युडाझम, शीखिझम किंबहुना अशा इतर कोणत्याही “इझम”शी संबंध नाही. हे सरळ साधे सत्य आहे कीः इतरांची हानी करण्याआधी नकारात्मक मानसिक विचारांच्या निर्मितीमुळे तुमची स्वतःची हानी प्रथम होते, आणि ही नकारात्मकता काढून टाकली, तर तुम्हाला स्वतःमध्येच शांतता मिळेल आणि विश्वशांती अधिक दृढ होईल.

जागतिक शांततेसाठी मनःशांती

धर्म म्हणवण्यालायक प्रत्येक धर्म त्याच्या अनुयायांना भावनिक शुद्धतेचा अभ्यास करण्यासाठी व मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि हृदयाची शुद्धता व नैतिक जीवन जगण्याविषयी उपदेश देतो. एक परंपरा असे सांगते, "Love thy neighbor"; “शेजाऱ्यावर प्रेम करा”, दुसरी सांगते, सलाम वालेकुम –‘तुझ्याबरोबर शांती राहोत’, आणखी एक सांगते, “भवतु सब्ब मंगलम्” किंवा “सर्वे भवन्तु सुखिनः” –“सर्वजण सुखी, आनंदी राहोत”. बायबल असो, कुराण असो अथवा गीता असो, सर्व धर्मग्रंथ शांती आणि बंधुत्वाचाच उपदेश करतात. भगवान् महावीरांपासून येशू ख्रिस्तापर्यंत सर्व थोर धर्मसंस्थापक सहिष्णुता आणि शांतता यांचे आदर्श होते. तरीही आपले जग धार्मिक आणि सांप्रदायिक संघर्षाप्रमाणे प्रेरित होते, किंवा युद्धाप्रमाणेही- कारण आपण धर्माच्या केवळ बाह्य आवरणाला महत्त्व दिलेले असते, आणि त्याच्या अंतरंगाकडे दुर्लक्ष केलेले असते. हा परिणाम प्रेमाच्या आणि दयेच्या मनातल्या अभावामुळे झालेला असतो.

प्रत्येक व्यक्तीमध्ये शांती निर्माण झाल्याशिवाय विश्वात शांती प्रस्थापित होऊ शकणार नाही. प्रक्षोभ आणि शांती एकत्र नांदू शकत नाहीत. अंतर्गत शांती प्राप्त करण्याचा एक मार्ग म्हणजे विपश्यना किंवा सूक्ष्म दृष्टीने ध्यान – एक असांप्रदायिक, वैज्ञानिक, परिणाम-केंद्रित तंत्रज्ञान अशी स्व-निरीक्षणाची आणि सत्यानुभूतीची साधनापद्धती. ह्या साधनापद्धतीच्या अभ्यासाने मन आणि शरीर यांच्या परस्पर-क्रियांचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभूतीतून मिळते. प्रत्येक वेळी मनामध्ये जेव्हा द्वेषासारखी नकारात्मक मानसिकता उदभवते, तेव्हा ती शरीरावर दुःखदायक संवेदनांना चालना देते. प्रत्येक वेळी मनामध्ये जेव्हा निरपेक्ष प्रेमाचा, दयेचा आणि सौहार्दाचा उदय होतो, तेव्हा संपूर्ण शरीरामध्ये जणू आनंददायी संवेदनांचा पूर लोटतो. विपश्यनेच्या अभ्यासातून हे सुद्धा समजते, की प्रत्येक शारीरिक आणि वाचिक कृतीआधी मानसिक कृती उमटते, जी ती प्रत्यक्ष कृती हितकारक असेल की अहितकारक असेल, ते ठरवते. मन अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण मनाला शुद्ध आणि शांत करणाऱ्या यथार्थ आणि अनुभविक पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे. जागतिक शांतता शिखर परिषदेतून तयार होणाऱ्या सामुहिक जाहीरनाम्याची परिणामकारकता अशा साधनापद्धतींमुळे आणखी वृध्दिंगत होईल.

प्राचीन भारताने दोन प्रकारच्या आचरण पध्दती विश्वाला दिल्या. एक म्हणजे योग आसनाचा शारिरिक व्यायाम आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी श्वासावर ताबा (प्राणायाम). दुसरा म्हणजे मन निरोगी ठेवण्यासाठी विपश्यनेतून मनाचा व्यायाम. कोणत्याही प्रकारच्या धर्मश्रध्दा असलेले लोक ह्या दोन्ही प्रकारच्या पध्दती आचरणात आणू शकतात. त्याचवेळी ते स्वतःचा धर्म शांततेने आणि एकतेने पाळू शकतात; धर्मांतर ज्याचे मूळ कारण तणाव आणि झगडा आहे ते करण्याची आवश्यकता नाही

समाज जर स्वस्थ रहायचा असेल तर समाजांतील जास्तीत जास्त लोक शांत असायला हवेत. नेते म्हणून आदर्श असणे व प्रेरणा देणे ही आपली जबाबदारी आहे. एकदा ज्ञानी पुरुष म्हणाले,” दुसऱ्यांचे अथिर मन स्थिर करण्यासाठी स्थिर मनाचीच आवश्यकता असते.”

सारांशाने, शांतिप्रिय समाज आपल्या नैसर्गिक स्थितित शांततेत राहाण्याचा मार्ग शोधेल. वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी, ते मलीन होणे थांबवण्याची गरज आहे हे आपल्याला समजते. पण ते करण्यापासून आपल्याला अडवतात ते आपले मानसिक दोष, जसे की अज्ञान, निष्ठूरता किंवा लोभीपण हे आहे. असे मालिन्य काढून टाकल्यास मानवांमध्ये शांतीला प्रोत्साहन मिळेल, तसेच समाज आणि नैसर्गिक वातावरण ह्यामधील समतोल व निरोगी संबंध राखण्यासाठी साहाय्यकारी होईल. अशा प्रकारे धर्म वातावरणाचे संरक्षण करण्यास उत्तेजन देऊ शकेल.

अहिंसाः धर्माच्या परिभाषेची किल्ली

दोन धर्मांमध्ये फरक असणे साहजिक आहे. काही झाले तरी ह्या जागतिक शांतता परिषदेंत जमलेल्या विविध विचार धारेच्या नेत्यांनी जागतिक शांततेसाठी काम करण्याचे दर्शविले आहे. प्रथम शांतता, नंतर पहिले मूलतत्व “ जागतिक धर्म ”चे. आपण सर्वजण जाहीर करूया की आम्ही ह्त्या करण्यापासून दूर राहू, आम्ही हिंसेची निंदा करतो. युध्द किंवा शांतता यांत मुख्य भूमिका बजावणाऱ्या राजकिय नेत्यानी देखील ह्या जाहीरनाम्यात सामील व्हावे ह्यासाठी मी आग्रह करेन. ते यामध्ये सामील होवोत वा न होवोत, कमीतकमी येथे आणि आता तरी आपण स्विकारु याः हिंसा आणि हत्येला क्षमा करण्याऐवजी, विषेशतः धर्माच्या नावाखाली जेव्हा हिंसेचे दुष्ट कर्म होते तेव्हा आम्ही अशा कृत्याची विनाअट निंदा करतो असे जाहीर करुया.

काही आध्यात्मिक नेत्यांना आपल्या स्वतःच्या धार्मिकश्रध्देच्या नावाखाली केलेल्या हिंसेला दोष देण्याचे द्रष्टेपण आणि धैर्य असतेच असते. केली गेलेली हिंसा आणि त्या हत्येला क्षमा मिळवण्याचे वा पश्चात्ताप करण्याचे तत्वज्ञान आणि ब्रम्हज्ञान अवलोकनाचे दॄष्टिकोन वेगळे असू शकतात; परंतु पूर्वी केलेल्या हिंसेची कबुली सूचविते की ते कृत्य चुकीचे होते आणि भविष्यांत अशांना क्षमा केली जाणार नाही.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या छत्राखाली आपण धर्म आणि अध्यात्माची अहिंसेला अधोरेखीत करणारी व्याख्या सुत्ररुपाने तयार करण्याचा प्रयत्न करु या, आणि हिंसा व हत्येला उत्तेजन देण्याचे नाकारुया. शांतता हाच धर्माला प्रतिशब्द असल्याची व्याख्या न केल्यास मानवजातीस या पेक्षा मोठे अपयश असणार नाही. ही शिखर परिषद “जागतिक धर्म” किंवा ”पंथरहित आध्यात्मिकता” या कल्पनेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या पसंतीसाठी पुढे करु या.

धर्माच्या खऱ्या उद्देशावर जगाचे लक्ष केन्द्रीत करण्यासाठी ही शिखर परिषद मदत करेल याची मला खात्री आहे.

धर्म आपल्याला एकत्र आणतो
विभक्त करीत नाही; तो आपल्याला शांती आणि अंतःकरणाची शुध्दता शिकवितो.

या ऐतिहासिक शिखर परिषदेचे आयोजन करणाऱ्यांचे त्यांच्या दुरददृष्टी व प्रयत्नांबाद्दल मी अभिनंदन करतो. मी धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांचे अभिनन्दन करतो ज्यांची परिपक्वता एकवाक्यतेसाठी काम करण्याची, तसेच अशी आशा दाखविताना की ज्यामुळे धर्म आणि आध्यात्मिकता मानवजातीला शांततापूर्वक भविष्याकडे नेईल.

सर्वजण द्वेषापासून मुक्त होवोत आणि सुखी होवोत.

ऐक्य आणि शांती नांदो.