श्री सत्य नारायण गोयन्काजी यांचे शांति परिषदेला संबोधित भाषण
बिल हिगिन्स ऑगस्ट २९, २०००न्युयॉर्क---, जिथे पहिल्या प्रथम आध्यात्मिक तसेच धार्मिक नेत्यांचे संमेलन भरले होते तिथे विपश्यना आचार्य गोयन्काजीनी सहस्राब्दि विश्व शांति संमेलनांतील प्रतिनिधिंना राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्ली हॉलमध्ये संबोधित केले.
धार्मिक समन्वय, सहिष्णुता तसेच शांतिपूर्व सह-अस्तित्व इत्यादि विषयांवर चर्चा चालू असताना आचार्य गोयन्काजीनी कॉन्फ्लिक्ट ट्रांसफॉर्मेशन नामक सत्रामध्ये भाषण दिले.
“लोकांना एका संप्रदायातून दुसऱ्या संप्रदायात रुपांतर करण्याऐवजी”, श्री गोयन्काजी म्हणाले, “हे चांगले होईल की लोकांना दुःखापासून सुखाकडे, बंधनातून मुक्तिकडे, क्रूरतेपासून करुणेकडे वळविण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे.”
जवळजवळ दोन हजार प्रतिनिधी आणि निरिक्षकांच्या समुदायासमोर संमेलनातील दुपारच्या सत्रांत श्री गोयन्काजीनी हे भाषण दिले. हे सत्र सी.एन.एन. चे संस्थापक टेड टर्नर यांच्या भाषणानंतर झाले. श्री टर्नर हे संमेलनाच्या आर्थिक पुरस्कर्त्यापैकी एक होते.
शिखर संमेलनाचा विषय विश्व शांति हा आहे हे ध्यानात ठेवून श्री गोएन्काजीनी ह्या गोष्टीवर जोर दिला की जोपर्यंत व्यक्तिव्यक्तिमध्ये आंतरिक शांति नसेल, तोपर्यंत विश्वामध्ये शांति स्थापन होऊ शकणार नाही. “ विश्वामध्ये शांति प्रस्थापित होऊ शकणार नाही जोपर्यंत लोकांच्या मनांत क्रोध तसेच घृणा आहे. मैत्री आणि करुणेने भरलेल्या हॄदयाद्वारेच विश्वामध्ये शांति स्थापित होऊ शकेल.”
शिखर संमेलनाचा महत्वपूर्ण उद्देश हा आहे की विश्वामध्ये सांप्रदायिक लढाई-भांडण तसेच तणाव कमी करणे. ह्याबद्दल बोलताना श्री गोएन्काजी म्हणाले, “ जोपर्यंत अंतःकरणात क्रोध व द्वेष आहे तोपर्यंत, जरी तो इसाई असो, हिन्दू असो, मुसलमान असो किंवा बौध्द असला तरी सुध्दा दुःखीच असणार.”
तसेच टाळ्यांच्या कडकडाटातच त्यांनी सांगितले, “ ज्यांच्या शुध्द हॄदयांत प्रेम तसेच करुणा आहे तेच आंतरिक स्वर्गीय सुखाचा अनुभव करु शकतात. हाच निसर्गाचा नियम आहे, कुणाला वाटल्यास ईश्वराची इच्छा आहे असे समजावे.”
विश्वांतील प्रमुख धार्मिक नेत्यांच्या ह्या सभेत त्यांनी सांगितले, “ आपण सर्व संप्रदायांच्या समान तत्वावर ध्यान देऊ या, त्यांना महत्व देऊ या. हॄदयाच्या शुध्दतेला महत्व देऊ या, जे सर्व संप्रदायांचे सार आहे. वादविवाद टाळण्यासाठी बाह्य कवचाकडे जसे की सांप्रदायिक कर्मकांड, आचारपध्दती, उत्सव, परंपरा इत्यादिची दखल न घेता आपण धर्माच्या ह्या अंगाला महत्व देऊ.”
आपल्या प्रवचनाचा सारांश सांगताना श्री गोएन्काजीनी सम्राट अशोकाच्या शिलालेखातील वाक्याचा उल्लेख केला ज्यात म्हटले आहे की, “ फक्त आपल्याच धर्माचा सन्मान आणि दुसऱ्यांच्या धर्माची निंदा करु नये. तर पुष्कळशा इतर कारणांमुळे दुसऱ्यांच्या धर्माचा सन्मान करायला हवा. असे केल्याने आपल्या धर्माच्या वाढीस मदत होतेच शिवाय दुसऱ्यांच्या धर्माची सेवा देखील होते. असे न केल्यास आपल्या धर्माची तर कबर खोदली जातेच परंतु दुसऱ्यांच्या धर्माची देखील हानी होते. जो कोणी आपल्या धर्माचा सन्मान करत दुसऱ्यांच्या धर्माची निंदा आपल्या धर्माच्या भक्तीपोटी करत असताना विचार करेल की, “मी माझ्या धर्माचा मी गौरव करेन; परंतु स्वतःच्या अशा वागण्यामुळे तो आपल्याच धर्माचे मोठे नुकसान करतो. ऐक्य हे चांगले आहे. दुसऱ्या धर्मांचा जो उपदेश आहे तो आपण ऐकूया आणि ऐकण्याची उत्सुकता दाखवूया.”
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव कोफी अन्नान यांनी आशावाद दाखविला की, “ या शिखर परिषदेमध्ये एकत्रित झालेल्या विश्वांतील प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांच्या शांतिच्या एकोप्याने केलेल्या पुकारामुळे नव्या सहस्राब्दिमध्ये शांति वाढेल.”
पहिल्या प्रथमच अशा प्रकारच्या झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या या परिषदेत आध्यात्मिक नेत्याना आमंत्रित केले होते ज्यामध्ये स्वामिनारायण चळवळीतील प्रमुख स्वामी, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी अग्निवेश, माता अमृतानंदमयी देवी आणि दादा वासवानी खेरीज प्रमुख विद्वान जसे की डॉ. करण सिंग व एल. एम. सिंघवी ह्यांचा समावेश होता.
धार्मिक आणि सांस्कृतिक वैविध्यतेतील भाग घेणाऱ्यांचा संदर्भ देताना अन्नान म्हणाले,” संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे वेलबुट्टीदार कापड आहे, फक्त साडी व सुटाचे नव्हे तर पाद्री लोकांची गळपट्टी, नन्सचा(जोगीण) पोषाख आणि लामांचा झगा; बिशपचा, डोक्यावरील टोपी, यारमुल्क इत्यादि.”
पुन्हा पुन्हा अन्नानना तिबेटन नेत्यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारले असता, प्रयत्नपूर्वक प्रश्नाचा रोख परिषदेच्या उद्देशाकडे वळवून ते म्हणाले,” शांतीदूत आणि शांतता प्रस्थापित करणारी ही धर्माची रास्त भूमिका पुनर्स्थापित करण्यासाठी—वादविवादाचा प्रश्न हा बायबल किंवा तोराह किंवा कुराण असा कधीच नव्हता. खरोखर श्रद्धेचा प्रश्न कधीच नव्हता—विश्वास आणि आपण एकमेकाशी कसे वागतो हा होता. विश्वासपूर्ण असा शांती आणि सहिष्णुतेचा मार्ग तुम्ही परत एकदा शिकविला पाहिजे.”
संयुक्त राष्ट्र्संघाच्या नेत्यांनी आशा केली की जर जगांतील ८३%लोकसंख्या वरपांगी धार्मिक किंवा आध्यात्मिक विश्वासाला चिकटून रहात असेल तर ह्या धार्मिक नेत्यांनी आपल्या प्रभावाने अनुयायांना शांतीकडे वळवले पाहिजे.
संयुक्त राष्ट्रसंघ आशा करतो की परिषदेमुळे जागतिक समाज योग्य बाजूकडे वळेल, शब्दांच्या एका दस्तावेजामध्ये सांगायचे म्ह्णजे, ”आध्यात्मिक बळ स्विकारू आणि अत्यंत वाईट अशा मानवी क्रूरतेचे निर्मूलन आपल्या हातांत आहे हे ओळखू-युध्द- तसेच युध्दाच्या मूळ कारणापैकी एक म्हणजे गरीबी. जगांतील आध्यात्मिक नेत्यांनी संयुक्त राष्ट्रासमवेत एकत्रित होऊन मनुष्यजातीच्या अत्यावश्यक गरजा संबोधित करण्याची वेळ आलेली आहे.”
सहभागी नेत्यांनी जागतिक शांततेकरिता जाहीरनाम्यावर सह्या केल्यानंतर तसेच शांतता स्थापनेकरिता आणि शांतता राखण्याकरिता संयुक्त राष्ट्र संघ आणि राष्ट्रसंघाचे महासचिव यांच्यासमवेत कार्य करणारी धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांची आंतरराष्ट्रीय सल्लागार परिषद स्थापन झाल्यानंतर सदरहू शिखर परिषद येत्या गुरुवारी दि. ३१ ऑगस्ट रोजी समाप्त होईल.
“धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार परिषदेचे ध्येय, संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्याचे विस्तारिकरण आणि मजबूतीकरण हे आहे”, असे जागतिक शांतता शिखर परिषदेचे महासचिव श्री. बावा जैन यांनी सांगितले. “विवादाप्रसंगी, जगातील थोर आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांना अशा ज्वलंत मुद्द्यांवर अहिंसात्मक तोडगा काढण्यासाठी एका पीठावर आणता येईल, अशी आमची प्रामाणिक आशा आहे.”