जीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना

बर्न, स्वित्झर्लंडमध्ये श्री सत्य नारायण गोयन्काजीनी केलेल्या प्रवचनावर आधारित संहिता.

आपणा सर्वानाच सुख आणि शांती हवी असते, कारण की आमच्या जीवनांत खरोखरच सुख आणि शांती नसते. आपण सर्वच वेळोवेळी द्वेष,दौर्मनस्य,क्रोध,भय,ईर्षा इत्यादि कारणामुळे दुःखी होतो. आणि जेव्हा आम्ही दुःखी होतो तेव्हा ते आपल्यापुरतेच सीमित ठेवत नाही तर ते दुःख दुसऱ्याना देखील वाटतो. जेव्हा कोणती व्यक्ती दुःखी होते तेव्हा आसपासचे वातावरण देखील अप्रसन्न बनविते,आणि त्या व्यक्तिच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंवर देखील परिणाम होतो. खरोखरच, हा जीवन जगण्याचा योग्य मार्ग नाही.

आपण स्वतःही शांतीपूर्ण जीवन जगणे आणि दुसऱ्यांसाठीही शांततेची निर्मिती करणे अगत्याचे आहे. शेवटी आपण सामाजिक प्राणी आहोत, आपल्याला समाजात राहावे लागते आणि समाजातल्या अन्य व्यक्तींबरोबर पारस्पारिक संबंध ठेवावे लागतात. अशा स्थितीत आपण शांतीपूर्वक जीवन कसे जगू शकतो? कसे आपण आपल्या आतमध्ये सुख तसेच शांतीचे जीवन जगू शकतो, आणि कसे आपल्या आसपासही शांती आणि सौमनस्याचे, सौहार्दाचे वातावरण निर्माण शकतो, जेणेकरून समाजातले अन्य लोकही सुख आणि शांतीचे जीवन जगू शकतील?

आपले दुःख दूर करण्यासाठी प्रथम आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की आपण अशांत व बेचैन का होतो. ह्याकडे लक्ष देऊन पाहिले तर लक्षांत येईल की जेव्हा मन विकारामुळे विकॄत होऊन जाते तेव्हा ते मन अशांत होऊन जाते. आपल्या मनांत विकारदेखील आहेत आणि त्याचवेळी आपण सुख तसेच शांतीचा अनुभव घेऊ, हे अशक्य आहे.

हे विकार का आणि कसे उत्पन्न होतात? पुन्हा खोलवर शोध घेतल्यास हे स्पष्ट होते की, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला न आवडणारा व्यवहार करते किंवा जे घडते ते आपल्याला आवडत नाही, ह्याची ती प्रतिक्रिया असते. अप्रिय घटना घडतात आणि आपण आंतरिक तणाव निर्माण करतो. मनाप्रमाणे न होण्यामुळे, किंवा मनाप्रमाणे होण्यात काही बाधा येत असेल तर आपण तणावग्रस्त होतो आणि अंतरमनांत गांठी बांधायला सुरूवात करतो.जीवनभर अप्रिय घटना होत रहातात, कधी मनाप्रमाणे होतात, कधी होत नाहीत, आणि आपण जीवनभर प्रतिक्रिया करत राहतो आणि गांठी बांधत राहतो. आपले पूर्ण शरीर तसेच मन इतक्या विकारांनी, इतक्या तणावांनी भरून जाते की आपण दुःखी होऊन जातो.

ह्या दुःखापासून वाचण्याचा एकच उपाय आहे की आपल्या आयुष्यात अप्रिय घटना घडूच द्यायची नाही, सर्वकाही मनाप्रमाणे व्हावे. किंवा आपल्याला अशी शक्ती जागृत करायला हवी, किंवा अशी शक्ती असलेला दुसरा कुणी मदतकर्ता असावा जो नको असणाऱ्या घटना घडूच देणार नाही आणि आपल्याला हवे असलेलेच होत जाईल. परंतु हे अशक्य आहे. जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की ज्याच्या सर्व इच्छा सर्वकाळ पूर्ण होतील, ज्याच्या आयुष्यांत सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे घडत राहील, अगदी मनाविरूद्ध काहीही न होता. जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये मनाविरुद्ध घटना घडतच राहणार. अशा वेळेस प्रश्न उठतो की, विषम परिस्थिती ऊत्पन्न झाल्यावर आपण अंध प्रतिक्रिया देणे कसे थांबवावे? कसे आपण तणावग्रस्त न होता शांत आणि संतुलित राहू शकू?

भारत तसेच भारताबाहेरील देशांतसुद्धा काही संत पुरुषांनी ह्या समस्येचा अभ्यास केला, मानवी जीवनांतील दुःखाच्या समस्येचा शोध घेतला आणि उपाय सांगितला की जर काही मनाविरुध्ध घडले तर मनामध्ये क्रोध, भय किंवा अन्य विकाराची प्रतिक्रिया उत्पन्न झाला तर शक्यतो लवकर आपले मन दुसऱ्या कशांत तरी गुंतवावे. उदाहरणच द्यायचे तर उठा एक ग्लास पाणी घ्या आणि पाणी प्यायला सुरुवात करा की ज्यामुळे आपला क्रोध वाढणार नाही, उलट कमी होण्यास सुरुवात होइल. किंवा आकडे मोजायला सुरुवात करा; एक, दोन, तीन, चार. किंवा एखादा शब्द,जप किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणा, अथवा ज्याप्रती तुमची श्रद्धा आहे अशा देवतेच्या किंवा संत पुरुषाच्या नावाचा जप चालू करा की जेणे करुन तुमचे मन दुसरीकडे गुंतेल आणि काही प्रमाणांत तरी तुम्ही विकार व क्रोधापासून मुक्त व्हाल.

ह्याने मदत झाली. हा उपाय कामी आला. आज सुध्दा कामी येतो. असे वाटते की मन व्याकुळतामुक्त झाले. परंतु हा उपाय केवळ वरवरच्या जाणिव असलेल्या स्तरांवरच काम करतो. वस्तुतः मन दुसरीकडे गुंतवून आपण विकारांना अंतरमनाच्या खोलवर दाबून ठेवतो, जेथे त्याचे प्रजनन आणि संवर्धन चालूच राहते. मनाच्या वरच्या स्तरावर शांती आणि सौमनस्याचा लेप लागतो,परंतु अंतर्मनांत खोलवर दाबलेल्या विकारांचा सुप्त ज्वालामुखी तसाच राहतो, ज्याचा आता किंवा नंतर वेळ आल्यावर स्फोट होऊन ऊद्रेक होणारच.

आंतरिक सत्याचा शोध घेणाऱ्या काही वैज्ञानिकांनी त्याच्या पुढे जाऊन शोध घेतला. आपले मन आणि शरीराच्या सत्यतेचा आंतरिक अनुभव घेतला आणि पाहिले की मनाला दुसरीकडे गुंतवून फक्त मूळ समस्येपासून दूर पळून जाणे आहे. खरोखरच पलायन करणे हा यावर उपाय नव्हे, तर त्या समस्येला सामोरे जायला हवे. जेव्हा मनामध्ये विकार उत्पन्न होईल तेव्हा फक्त पाहा आणि त्या समस्येला तोंड द्या. मनातील विकारांना पाहणे सुरु करताच तो क्षीण होत जाईल आणि हळूहळू त्या विकाराचा क्षय होत जाईल.

हा चांगला उपाय आहे. ह्यात दाबून टाकणे आणि मोकळे सोडणे या दोन्ही टोकाच्या गोष्टी टाळल्या जातात. अज्ञात अवस्थेंतील अंतरमनांतील विकाराना दाबून टाकण्याने त्याचे निर्मूलन होत नाही, आणि विकारांना अहितकारक अशा शारीरिक तसेच वाणीच्या कर्मांना मोकळी सूट देण्याने समस्या आणखी वाढतात. परंतु तुम्ही जर विकाराकडे पाहत राहाल तर त्याचा क्षय होईल आणि त्यापासून मुक्तता मिळेल.

बोलणे एकदम सोपे आहे,परंतू करणे एकदम कठीण. आपल्या विकाराला तोंड देणे एव्हढे सोपे नाही. जेव्हा क्रोध उत्पन्न होतो, तेव्हा अशाप्रकारे आपल्यावर स्वार होतो की आपल्याला ते समजत सुद्धा नाही. क्रोधाने व्याकूळ होऊन, शारीरिक तसेच वाणीव्दारे आपण असे काम करतो की त्याने आपली तर हानी होतेच, पण दुसऱ्यांची देखील. जेव्हा क्रोध जातो तेव्हा आपण रडतो आणि पश्चात्ताप करतो, ह्या किंवा त्या व्यक्तिची किंवा भगवंताची क्षमायाचना करतो-- माझ्याकडून चुक झाली, मला माफ कर. परंतु जेव्हा पुन्हा अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा आपण तशीच प्रतिक्रिया करतो. पुन्हा पुन्हा पश्चात्ताप करण्याने काहीही फायदा होत नाही.

आपलेी अडचण ही आहे की जेव्हा विकार उत्पन्न होतो तेव्हा आपण विवेकबुध्दी घालवून बसतो. विकाराचा उद्गम अचेतन मनाच्या तळस्पर्शी खोलांतील अवस्थेतून होतो आणि जेव्हा तो सदसव्दिवेकतेपर्यंत पोहोचतो तेव्हा इतका बलवान होऊन आपल्यावर स्वार होऊन जातो, की आपण त्याला पाहू देखील शकत नाही.

समजा आपण कुणी प्रायव्हेट सेक्रेटरी ठेवला जो आपल्याला आठवण करुन देइल, बघा मालक, आपल्याला क्रोध आला आहे, आपण क्रोधाकडे पहा. परंतू क्रोध कधी उत्पन्न होइल हे समजत नाही म्हणून तीन शिफ्टसाठी तीन सेक्रेटरीज ठेवावे लागतील. समजा ते ठेवू शकलो, आणि क्रोध आल्यावर त्वरीत सेक्रेटरी सांगेल, बघा मालक, आपल्याला क्रोध आला आहे, तेव्हा पहिले काम हे कराल की त्यालाच दम भराल. मूर्ख कुठला मलाच तू शिकवितोस? आपल्या अंगात क्रोध एव्हढा भिनतो की कोणताही सल्ला अशा वेळेस कामी येत नाही.

समजा आपल्याला शहाणपण आले आणि आपण त्याला दम भरला नाही, आणि म्हणालो चांगले सांगितलेस. आता मी त्याकडेच पाहीन, त्या प्रती साक्षीभाव ठेवीन. पण हे शक्य आहे का? जेव्हा डोळे बंद करुन क्रोध पाहण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तेव्हा ज्यामुळे क्रोध आला तीच गोष्ट, तीच व्यक्ति, तीच घटना मनामध्ये परत परत येइल. मी क्रोध बघणार नाही तर त्याचे उगमस्थानच पहात राहीन. त्यामुळे क्रोध आणखीच वाढत राहील. म्हणुनच हा काही उपाय नाही. आलंबन बाजूला ठेऊन फक्त विकाराकडे पाहाणे अजिबात सोपे नसते.

परंतु, एखादी व्यक्ति पूर्ण मुक्त अवस्थेला पोहोचते,तेव्हा खरा उपाय सांगतो. अशी व्यक्ति शोधून काढते की जेव्हा मनामध्ये विकार उत्पन्न होतो तेव्हा शरीरावर दोन घटना त्याचवेळेस सुरु होतात. एक, श्वास आपली नैसर्गिक लय सोडुन देतो. जेव्हा मनामध्ये विकार उत्पन्न होतो, तेव्हा श्वास वेगवान व अनियमित होउन जातो. हे पाहाणे अगदी सोपे आहे. दोन, सूक्ष्म स्तरावर शरीरामध्ये एक जैवरासायनिक प्रक्रिया सुरु होते ज्याच्या परिणामामुळे शरीरावर संवेदना उत्पन्न होतात. प्रत्येक विकार शरीरावर कोणती ना कोणती तरी संवेदना उत्पन्न करतोच करतो.

हा एक अनुभविक उपाय आहे. सामान्य व्यक्ति अमूर्त विकाराना पाहू शकत नाही--अमूर्त भय, अमूर्त क्रोध, अमूर्त वासना इत्यादी. परंतु योग्य प्रशिक्षण तसेच प्रयत्न केल्यावर सहजपणे श्वास तसेच शरीरावर होणाऱ्या संवेदना पहाता येतात. या दोन्ही गोष्टींचा मनाच्या विकारांशी सरळ सरळ संबंध आहे.

श्वास तसेच संवेदना दोन प्रकारे मदत करतील. एक म्हणजे त्या प्रायव्हेट सेक्रेटरीचे काम करतील. मनामध्ये कोणताही विकार जागताक्षणीच, श्वास आपली नियमितता घालवून बसेल, सांगेल की--बघ काहीतरी गडबड आहे. आपण श्वासाची खरडपट्टी काढू शकत नाही, आपल्याला त्याचा इशारा मानावाच लागेल. तसेच संवेदना देखील सांगेल की काहीतरी चुकीचे होऊन राहिले आहे. दुसरे, इशारा मिळताच श्वास तसेच संवेदनाकडे पाहू शकाल. असे केल्यावर लगेच आपल्याला जाणवेल की विकार दूर होऊ लागले आहेत.

शरीर आणि मन, ह्यांचा परस्पर संबंध म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला मनामध्ये उत्पन्न होणारे विचार तसेच विकार आहेत, तर दुसऱ्या बाजूला श्वास आणि शरीरावर उत्पन्न होणाऱ्या संवेदना आहेत. मनात जेव्हा कोणताही विचार किंवा विकार उत्पन्न होतो, तेव्हा तो तत्क्षणी श्वास आणि संवेदनांना प्रभावित करतोच. ह्याप्रकारे, श्वास आणि संवेदनांना पाहताना आपण विकारांकडे पाहत असतो. आपण पलायन करत नसून विकारांना सन्मुख होत सत्याचा सामना करत असतो. लवकरच आपल्याला दिसेल की असे करण्याने विकारांची शक्ती क्षीण होत आहे, आधीप्रमाणे ते आपल्यावर स्वार होत नाहीत. आपण अभ्यास करत राहिलो, तर त्यांचे पूर्ण निर्मूलन होईल. विकारांपासून मुक्त होत होत आपण सुख तसेच शांतीपूर्ण जीवन जगायला लागू.

ह्याप्रकारे आत्मपरीक्षणाची ही विद्या आपल्याला आंतर आणि बाह्य अशी दोन्ही सत्ये अवगत करून देते. आधी आपण केवळ बहिर्मुख राहत होतो आणि आंतरिक सत्याला ओळखू शकत नव्हतो. आपल्या दुःखाचे कारण नेहमी बाहेर शोधत होतो. बाह्य परिस्थितीला कारण मानून ती बदलण्याचा प्रयत्न करत होतो. आतल्या सत्याबद्दलच्या अज्ञानामुळे आपण हे समजू शकत नव्हतो की, आपल्या दुःखाचे कारण आतमध्येच आहे, आणि ते म्हणजे सुखद तसेच दुःखद संवेदनांना दिलेली आंधळी प्रतिक्रिया.

आता, अभ्यासामुळे आपण नाण्याची दुसरी बाजू पाहू शकतो. आपण श्वाससुद्धा जाणू शकतो. आणि आत काय चालले आहे, तेसुद्धा. श्वास असो वा संवेदना, आपण त्याला मानसिक संतुलन न घालवता पाहू शकतो. प्रतिक्रिया बंद झाली, तर दुःखाचे संवर्धन होत नाही. त्याऐवजी, विकार वर येतात आणि त्यांची निष्कृती होते, क्षय होतो.

जसजसे आपण ह्या विद्येमध्ये परिपक्व होत जाऊ, तसतसा विकारांचा क्षय वेगाने होऊ लागतो. हळूहळू मन विकारांपासून मुक्त होऊ लागते, शुद्ध होऊ लागते. शुद्ध चित्त नेहमी प्रेमाने भरलेले असते -- सर्वांप्रती मंगलमैत्री, दुसऱ्यांकडील अभाव आणि त्यांच्या दुःखांप्रती करुणा, दुसऱ्यांचे यश आणि सुखाप्रती मुदिता अर्थात आनंद, आणि प्रत्येक स्थितीत समता.

जेव्हा एखादा त्या अवस्थेपर्यंत पोहोचतो, तेव्हा पूर्ण जीवनच बदलून जाते. तो शरीर आणि वाणीने असे को्णतेही काम करू शकत नाही, ज्यामुळे दुसऱ्यांची सुख-शांती भंग होईल. संतुलित मन शांत होऊन जाते आणि आपल्या आसपासही सुख-शांतीचे वातावरण निर्माण करते. अन्य व्यक्ती त्याच्यामुळे प्रभावित होतात, त्यांना मदत होऊ लागते.

जेव्हा आपण आतमध्ये अनुभवास येत असलेल्या प्रत्येक स्थितीत मन संतुलित ठेवतो, तेव्हा कोणत्याही बाह्य परिस्थितीचा सामना करत असताना तटस्थ भाव राहतो. हा तटस्थ भाव म्हणजे पलायन नाही, ना ही जगाच्या प्रश्नांप्रती उदासीनता किंवा बेपर्वाई आहे. विपश्यनेचा (Vipassana) नियमित अभ्यास करणारे दुसऱ्यांच्या दुःखाप्रती अधिक संवेदनशील असतात, तसेच व्याकुळ न होता त्यांच्या दुःखांच्या निराकरणासाठी मैत्री, करुणा आणि समतापूर्ण चित्तासमवेत ते हर प्रकारे प्रयत्नशील असतात. त्यांच्यामध्ये पवित्र तटस्थपणा येतो -- मनाचे संतुलन न हरवता पूर्ण रूपाने दुसऱ्यांच्या मदतीसाठी कसे वचनबद्ध होता येईल. ह्याप्रकारे दुसऱ्यांच्या सुख-शांतीसाठी प्रयत्नशील होऊन ते स्वतः सुखी आणि शांत राहतात.

भगवान बुद्धांनी हेच शिकविले--जीवन जगण्याची कला. त्यांनी कोणत्याही संप्रदायाची स्थापना केली नाही. त्यांनी आपल्या शिष्यांना मिथ्या गोष्टी, कर्मकांड शिकविले नाहीत. त्याऐवजी, त्यांनी अंतरातील(शरीरातील) नैसर्गिक सत्य पहायला शिकविले. आपण अज्ञानामुळे प्रतिक्रिया करत राहातो, त्याने आपली तर हानी होतेच, तसेच दुसऱ्यांची देखील हानी आपण करतो. जेव्हा सत्याला जसे आहे तसे पाहाण्याची प्रज्ञा जागॄत होते तेव्हा ही आंधळी प्रतिक्रिया करण्याचा स्वभाव दूर होतो. जेव्हा आंधळी प्रतिक्रिया थांबवितो तेव्हा खरी क्रिया करण्यालायक होतो-- असे काम की ज्याचा उगम सत्य पाहणाऱ्या आणि समजणाऱ्या संतुलित मनामध्ये होतो. असे काम सकारात्मक तसेच सृजनात्मक, आत्महितकारी तसेच परहितकारी असते.

आवश्यक हे आहे की स्वतःला ओळखा, जी खर तर सर्व संतांची शिकवण आहे. स्वतःला ओळखा, केवळ कल्पना, विचार किंवा अनुमानाने बौद्धिक स्तरावर नाही, भावुक होऊन भक्तिभावामुळे नाही, ऐकलेल्या, वाचलेल्याच्या अंधश्रद्धेपोटी नाही. हे ज्ञान काहीही कामाचे नाही. आपल्याला सत्याला स्वतःच्या अनुभवाने ओळखता यायला पाहिजे. शरीर तसेच मनाच्या परस्पर संबंधाचा प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे. ह्यामुळेच आपल्याला दुःखापासून मुक्ती मिळू शकेल.

आपल्या बाबतीत ह्या क्षणाचे जे सत्य आहे, जसे पण आहे ठीक त्या प्रकारे तसेच, त्याच्या खऱ्या स्वभावामध्ये पाहणे, समजणे हीच विपश्यना आहे. भगवान बुद्धाच्या काळात जनभाषेमध्ये पस्सना (पश्यना / passana) हे पाहणे याला म्हणत, ज्याला उघड्या डोळ्याने सामान्यपणे पहाता येते अशा स्थितीला. परंतु विपस्सना (विपश्यना) याचा अर्थ असा की एखादी गोष्ट जशी आहे तशीच त्याच्या खऱ्या स्वरूपामध्ये पहाणे, केवळ वर वर प्रतीत होणाऱ्या स्वरूपात नव्हे. भासमान सत्याच्या पलिकडे जाऊन संपूर्ण शरीर तसेच मनाबद्दल परम सत्य जाणणे आवश्यक आहे. जेव्हा आपण त्या सत्याचा अनुभव करतो तेव्हाच आपला आंधळी प्रतिक्रिया करण्याचा स्वभाव बदलून जातो, विकारांचे प्रजनन बंद होते, आणि आपोआप आपल्या जुन्या विकारांचे निर्मूलन होते. आपली दुःखापासून सुटका होते तसेच खऱ्या सुखाचा अनुभव यायला लागतो.

विपश्यना साधनेच्या शिबीरामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या तीन पायऱ्या आहेत. एक, अशा शारीरिक तसेच वाचिक कर्मापासून दूर राहणे, ज्यापासून दुसऱ्याची सुख-शांती भंग होऊ शकेल. ज्या वेळेस आपले शारीरिक तसेच वाचिक कर्म अशी असतील की ज्यामुळे आपल्या विकाराचे संवर्धन होत असेल अशावेळी आपण विकारापासून मुक्त होण्याचा अभ्यास करू शकणार नाही. म्हणूनच शीलाची आचारसंहिता पाळणे ही अभ्यास करण्याची पहिली महत्वपूर्ण पायरी आहे. जीव-हत्या, चोरी, लैंगिक व्यभिचार, खोटे बोलणे, नशा आणणाऱ्या वस्तू इत्यादिपासून अलिप्त रहाणे-- ह्या शीलांचे निष्ठापूर्वक पालन करण्याचा निर्धार करतो. अशा कर्मांपासून अलिप्त रहाण्यामुळे(शील पालन) काही प्रमाणात मन शांत होऊन पुढील काम करणे सोपे जाते.

दुसरी पायरी म्हणजे ह्या जंगली मनाला एका श्वासाच्या आलंबनावर लावून वश करणे. शक्य होईल तितका वेळ मन त्या आलंबनावर टिकवून ठेवण्याचा अभ्यास करावा लागतो. हा काही श्वासाचा व्यायाम नाही, श्वासाला नियमित करणे देखील नाही. त्याऐवजी नैसर्गिक श्वास पाहणे आहे, जसा आहे तसाच, जसा आंत येत आहे, जसा बाहेर जात आहे. ह्याप्रकारे मन आणखीनच शांत होते आणि तीव्र विकार आपल्यावर स्वार होत नाहीत. त्याच वेळेस मन एकाग्र होत जाते, तीक्ष्ण होत जाते, प्रज्ञेच्या लायक होते.

शील तसेच मनाला वश करणाऱ्या पहिल्या दोन पायऱ्या आवश्यक तर आहेतच पण लाभदायक देखील आहेत. परंतु जोपर्यंत आपण तिसरे पाऊल उचलत नाही तोपर्यंत विकाराचे फक्त दमनच केले जाईल. हे तिसरे पाऊल, तिसरी पायरी म्हणजे आपल्यातील सत्य जाणून विकाराच्या निर्मूलनाव्दारे होणारी मनाची शुद्धता. ही विपश्यना आहे-- संवेदनाच्या रूपाने प्रकट होणारे सततचे परिवर्तनशील अशा मन आणि शरीराशी परस्पर संबंधांना सुव्यवस्थित प्रकारे तसेच समतेसह पाहताना आपल्या बाबतीतील सत्याचा अनुभव करणे. हा भगवान बुद्धाच्या शिकवणीचा कळस आहे--आत्मनिरीक्षणाव्दारे आत्मशुद्धी.

सर्वजण ह्याचा अभ्यास करू शकतात. सर्वच दुःखी आहेत. ह्या विश्वव्यापी रोगाचा उपाय देखील सांप्रदायिक नव्हे तर विश्वव्यापी पाहिजे. जेव्हा कुणाला क्रोध उत्पन्न होतो तेव्हा तो बौद्ध क्रोध, हिंदू क्रोध, ख्रिस्ती क्रोध नसतो. क्रोध हा क्रोधच असतो. क्रोधाच्या कारणाने जी व्याकुळता येते त्याला ख्रिस्ती, यहुदी किंवा मुस्लिम व्याकुळता म्हणता येणार नाही. हा रोग विश्वव्यापी आहे. त्यामुळे त्याचा इलाज देखील विश्वव्यापी((सार्वजनिक) हवा.

विपश्यना असाच एक वैश्वीक उपाय आहे; जो दुसऱ्यांच्या सुख-शांतीचा भंग होऊ देत नाही. तो शीलाचे पालन करण्यास विरोध करणार नाही. मनाला वश करण्याच्या अभ्यासाला कुणी विरोध करणार नाही. ज्यामुळे मनांतील विकार दूर होतात अशा आपल्या बाबतीतील सत्य ओळखणाऱ्या प्रज्ञेला कुणी विरोध करणार नाही. विपश्यना अशीच एक वैश्विक विद्या आहे.

आंतरिक सत्याला पाहण्याने सत्याला जसे आहे तसे पाहणे---हेच प्रत्यक्ष अनुभवाने आपण स्वतःला जाणणे आहे. धीराने प्रयत्न करता करताच आपल्याला विकारापासून मुक्ती मिळते. स्थूल भासणाऱ्या सत्यापासून सुरू करून साधक शरीर तसेच मनाच्या परमसत्यापर्यंत पोहोचतो. त्यानंतर त्याच्याही पलीकडे, शरीर तसेच मनाच्या पलीकडे, वेळ तसेच स्थानाच्या पलीकडे, स्थिती सापेक्ष जगापलीकडे-- विकारांपासून संपूर्ण मुक्तीची सत्यता, सर्व दुःखापासून संपूर्ण मुक्तीचे सत्य. जे परमसत्य ज्याला काहीही नांव द्या, सर्वांसाठी हेच अंतिम लक्ष्य आहे.

सर्वच त्या परमसत्याचा साक्षात्कार करोत. सर्व प्राणी दुःखापासून मुक्त होवोत. सर्व प्राणी शांत होवोत, सुखी होवोत.

सर्वांचे मंगल होवोत.