आचार्य गोयन्काजींचा धम्मसेवेचे महत्व यावर संदेश

सेवा देता देता आपण हे शिकत असतो, की धर्माचा दैनंदिन जीवनात कशा रितीने उपयोग करता येईल. अखेर धर्म म्हणजे काही दैनंदिन जबाबदाऱ्यांपासून पलायन नव्हे. शिबीराच्या वेळेस किंवा कोणत्याही विपश्यना केन्द्रावरील छोट्याशा दुनियेत साधकांबरोबर धर्मानुसार व्यवहार करताना प्राप्त परिस्थितीला सामोरे जाऊन आपण जणू स्वतःला तयार करत असतो, की जेणेकरून बाह्य विश्वातही आपण निरनिराळ्या परिस्थितींमध्ये धर्मानुसार काम करु शकू. वस्तुतः घटना आपल्या मनाविरुद्ध घडतच असतात, तरीही अशावेळी आपण मनाचे संतुलन राखण्याचा अभ्यास करतच असतो आणि त्याप्रती प्रतिक्रियेच्या रूपात मैत्री व करुणेची भावना विकसित करत राहते. हे एक प्रशिक्षण आहे ज्यात आपण प्राविण्य मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. शिबीरासाठी बसलेल्या साधकांप्रमाणेच आपण सुध्दा तसेच साधक असतो.

विनम्रतापूर्वक दुसऱ्याना सेवा देताना आपण शिकतच राहावे. असाच विचार करा,” मी येथे शिक्षण प्राप्त करीत आहे, आणि त्या बदल्यात माझी कुठलीही अपेक्षा नाही. मी सेवा देतो कारण दुसऱ्यानांदेखील धम्मापासून फायदा मिळावा. चांगला आदर्श ठेवताना मला त्याना मदत करु दे आणि असे करतानाच मी स्वतःला देखील मदत करीत आहे.”

सर्वजण जे धर्मसेवा देत आहेत ते धर्मामध्ये पुष्ट होवोत. दुसऱ्याप्रती सद्भाव,मैत्री व करुणेचा भाव विकसीत करायला शिकोत. आपण सर्वजण धर्मामध्ये प्रगती करुन खरी शांती, खरी मैत्री व खऱ्या सुखाचा अनुभव करोत.

आचार्य सत्यनारायण गोयन्का